नवनीत राणा यांचा 25 श्रेष्ठ खासदारांच्या यादीत समावेश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन –   फेम इंडिया मासिक आणि आशिया पोस्ट सर्व्हेक्षणात भारतातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या 25 महिलांची यादी प्रसिद्ध केली असून यात अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांचा देशातील 25 श्रेष्ठ खासदारांमध्ये समावेश करण्यात आला आहे . या सर्व्हेक्षणसाठी महिला सशक्तीकरण, फेम इंडिया मासिक, आशिया पोस्ट, सामाजिक स्थिती, प्रतिष्ठा, प्रतिमा, उद्देश, प्रयत्न आदी 10 निकषावर नामनिर्देशन पाहण्यात आले.

खासदार नवनीत रवी राणा यांच्या खासदारकीला आता दीड वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. खासदार राणा यांच्या आक्रमक पवित्र्याची सभागृहात, प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे यांनी दखल घेतली व अल्पावधीतच त्यांची ओळख एक सक्षम खासदार म्हणून देशात निर्माण झाली आहे.

महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती व नावीन्यपूर्ण विकासाचा अजेंडा घेऊन त्या धडाक्याने कार्यरत आहे. पती आमदार रवी राणा यांच्या मार्गदर्शनात त्यांनी राबविलेले अनेक सामाजिक लोकोपयोगी उपक्रमामुळे त्यांचे नाव सर्वदूर गाजत आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन आशिया पोस्ट व फेम इंडिया यांनी केलेल्या सर्वेमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देशातील पहिल्या 25 श्रेष्ठ खासदारांच्या यादीत त्यांना समाविष्ट करून हा बहुमान देण्यात आलेला आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल समाजातील विविध मान्यवर तसेच संघटनेकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.