खासदार नवनीत राणा यांचा रिपोर्ट पुन्हा ‘पॉझिटिव्ह’ ! डॉक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला

पोलिसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 18 ऑगस्ट : अमरावती मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी कोरोनावर नुकतीच मात केली होती. मात्र, मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा तपासणी केल्यावर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना दोन दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज दिला होता. खुद्द नवनीत राणा यांनी स्वत: रुग्णालयातून बाहेर पडत आहे, असे सांगितले होते. तरीही, त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आज मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची कोरोना विषाणूची चाचणी केली. यात दोघांचेही कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दोघांचेही कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय.

मुंबई पालिकेच्या डॉक्टरांनी राणा दाम्पत्यांना 15 दिवस होम क्वारंटाइनचा सल्ला दिलाय. त्यामुळे पुढील 15 दिवस नवनीत राणा या क्वारंटाइन राहणार आहेत.

खासदार नवनीत राणा यांना 6 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 12 सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं अहवालातून स्पष्ट झाले होते. सुरुवातील नवनीत राणा यांच्यावर अमरावतीमध्ये उपचार केले होते. मात्र, श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना तातडीने नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, नागपूरमध्येही उपचारादरम्यान नवनीत राणा यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे 13 ऑगस्ट रोजी नवनीत राणा यांना तातडीने मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.

लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवले होते. अखेर, उपचाराअंती त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज दिला होता. पण, आता परत कोरोना चाचणीचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.