ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये आतापर्यंत १० बैठका झाल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी हे दोन्ही पक्ष आपापल्या बाजूवर ठाम राहिले आहेत. या मुद्द्यावरून तिढा निर्माण झाला होता. मात्र, आता हा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये मोठा हिंसाचार झाला

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी अनेक भागांत हिंसाचार झाला. पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले. या प्रकरणी २२ एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत. तर २०० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याशिवाय शेतकरी नेत्यांविरोधातही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा सुरू असताना एक ट्रॅक्टर उलटला. यामध्ये नवरीत नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. नवरीत याआधी दोनदा शेतकरी आंदोलनात सहभागी झाला होता. प्रजासत्ताक दिनी तो ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झाला. मात्र घरी परतलाच नाही. त्याच्या मृत्यूची माहिती समजताच कुटुंबावर शोककळा पसरली.

नवरीतला भारतात परतून दोन वर्ष झाली होती. तो आणखी वर्षभरानं पुन्हा ऑस्ट्रेलियात जाणार होता. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नवरीत दोनदा दिल्लीला गेला होता. केंद्रानं मंजूर केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. त्यामुळे ते रद्द केले जावेत, अशी नवरीतची भूमिका होती. याच मागणीसाठी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चात नवरीत सहभागी झाला. मात्र मार्चदरम्यान नवरीतचा ट्रॅक्टर उलटला. त्यात त्याचा मृत्यू झाला. याची माहिती कुटुंबीयांना समजताच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

नवरीत आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. रुद्रपूरच्या जवळ असलेल्या रामपूरच्या डिबडिबा गावात वास्तव्यास असलेला २६ वर्षीय नवरीत आधी ऑस्ट्रेलियात राहायचा. त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाचा स्टडी व्हिसा होता. दोन वर्षांपूर्वी त्यानं ऑस्ट्रेलियात मनशीत कौरसोबत विवाह केला. रिसेप्शन देण्यासाठी तो घरी आला होता. स्टडी व्हिसावर नोकरी केल्या प्रकरणी त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली. त्यामुळे त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.