पाकिस्तानचा त्या युद्धात केला पराभव ; म्हणून साजरा केला जातो नौदल दिन 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये आज पर्यंत चार युद्ध झाली आहेत. या पैकी एका हि युद्धात पाकिस्तान विजयी होऊ शकला नाही. १९४७-४८, १९६५, १९७१, १९९९ अशी हि चार युध्दे आहेत.त्यापैकी १९७१ च्या युद्धात भारतीय नौदलाने केलेली कामगिरी अतुलनीय स्वरूपाची आहे. या कामगिरीच्या स्मृती चिरायू ठेवण्यासाठी ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.

१९७१ च्या युद्धाची अशी झाली तयारी
४ डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. त्याआधी नौदल सप्ताह साजरा केला जातो. १९७१ साली एप्रिल महिन्यातच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. आजच्या बांग्लादेश आणि तेव्हाच्या पूर्व पाकिस्तान मधून निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे भारतात दाखल होत होते त्यांच्या भारतात येण्याला भारत रोखू शकत नव्हता कारण जुलमी पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या अत्याचाराला कंटाळून हि माणसे भारतात आसरा मिळण्यासाठी येत होते त्यातील काही लोक लष्कराच्या जुलमाने जखमी होऊन भारतात येत होते त्यांच्या उपचाराची आणि देखभालीची जबाबदारी भारत सरकारला करावी लागत होती त्यामुळे या समस्येला एकच उपाय होऊ शकत होता तो म्हणजे युद्ध.

युद्धाच्या घोषणेच्या तयारीत असलेल्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी मंत्रिमंडळा सोबत तिन्ही दलाच्या प्रमुखांची एक बैठक बोलावली यात त्यांनी पाकिस्तान सोबत आपण युद्ध पुकारण्याच्या तयारीत आहोत असे सांगितले. त्या काळात इंदिरा गांधींच्या निर्णयाच्या विरोधात बोलण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती परंतु तत्कालीन लष्कर प्रमुख सॅम माणेकशॉ  यांनी मात्र इंदिरा गांधींना नोव्हेंबर पर्यंत युद्ध टाळण्याचा सल्ला दिला कारण एप्रिल ते नोव्हेंबर भारताच्या लष्कराला युध्दाची तयारी करण्यास वेळ मिळेल तसेच चीन थंडीच्या काळात पाकिस्तानच्या मदतीला धावून येणार नाही.इंदिरा गांधींनी लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांचा सल्ला तात्काळ मान्य केला.

१९७१ च्या युद्धात नौदलाने अशी केली कामगिरी
भारताने आपल्या विमानतळांवर पाकिस्तानने हवाई हल्ले केल्यानंतर युद्धाची घोषणा केली. भारताला हादरा देण्यासाठी भारताची विमानवाहू नौका ‘आयएनएस विक्रांत’ समुद्राच्या पाण्यात बुडवण्याचा डाव पाकिस्तानने आखला. भारताच्या गुप्तचर विभागाला हा डाव समजताच भारताने पाकिस्तानचे नौदल गारद करण्याची मोहीमच सुरु केली. पाकिस्तानच्या ‘पीएनएस गाझी’ भारताच्या नौदलाने चुकीचे संदेश पाठवून दिशाभूल केले आणि दिशाभूल झालेल्या नौकेवर हल्ला चढवून गाझी नौका समुद्राच्या तळाशी घालवली. गाझी नौका समुद्रात बुडवणे हे भारताच्या नौदलाचे सर्वात मोठे यश होते तर या घटने नंतर पाकिस्तान लष्कराला चांगलाच हादरा बसला. ३ आणि ४ डिसेंबर १९७१ च्या मध्यरात्री  भारताच्या नौदलाने जगातील सर्वच देशांना अवाक करणारे मोठे घनघोर युद्ध केले. ४ डिसेंबर रोजी तर भारतीय  नौदल  कराची  बंदराला जाऊन भिडले आणि पाकिस्तानी नौसेना भारतीय नौदलाच्या तुफानी आग गोळ्याची शिकार होऊ लागली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन भारतीय नौदल कराची बंदराला येऊन पोहचेल अशी पाकिस्तानने स्वप्नात हि कल्पना केली नसेल परंतु ती कामगिरी भारतीय नौदलाने सत्यात करून दाखवली. ३ आणि ४ डिसेंबर रोजी केलेल्या या अलौकिक शौर्याची आठवण म्हणून ४ डिसेंबर हा भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच आज भारतीय नौदल जगात पाचव्या स्थानावर आहे.