…यासाठी पूनावाला स्वतः जबाबदार; नवाब मलिकांचे वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी लसींच्या पुरवठ्यावरून आपल्याला धमकावले जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केले. ‘हे सगळं संशय निर्माण करणारं असून याला पूनावाला स्वतः जबाबदार आहेत, असे ते म्हणाले.

देशात सध्या कोरोना प्रतिबंधक लसींच्या पुरवठ्यावरून वातावरण तापले आहे. त्यातच अदर पूनावाला यांनी आपल्याला धमकावले जात असल्याचा आरोप केला. त्यावरून नवाब मलिक यांनी वक्तव्य केले आहे. नवाब मलिक म्हणाले, ‘देशात सीरमला लस तयार करण्याचा परवाना देण्यात आला. लस ही गरज आहे. त्यामुळे लसींचे उत्पादन वाढवणे सरकारचेही काम आणि सीरमचेही काम आहे. यापूर्वी केंद्राला 150 रुपये, राज्याला आधी 400 आणि नंतर 300 रुपये तर खासगी रुग्णालयासाठी 700 रूपये लस देण्याचे पूनावाला यांनी जाहीर केले. हे सगळे संशय निर्माण करणारे असून याला पुनावाला स्वतः जबाबदार आहेत. त्यांना कोणी बदनाम करत नाही’.

लसींसाठी कुठलंही नियोजन नाही

मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले, की ‘देश अडचणीत आणून इतर देशांना लस देणे योग्य नव्हते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कुठलंही नियोजन नाही. नुसती माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही कार्यपद्धत योग्य नाही’.

कोरोनावर मात करता येईल असा कार्यक्रम तयार करावा

देशामध्ये जे कोरोनाचे संकट आहे. या आरोग्य आणीबाणीत केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवावी त्यांची एकजूट करावी आणि त्याच्यातून निश्चित धोरण तयार करून कोरोनावर मात देता येईल, असा कार्यक्रम तयार करावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.