डान्सबार बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं ‘डील’

मुंबई : वृत्तसंस्था- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. डान्सबार बंदी उठव्यासाठी मुख्यमंत्र्यांनी डील केलं असं त्यांनी म्हटलं आहे. इतकेच नाही तर, बार मालक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये शायना एनसी यांनी मध्यस्थी केली असा आरोपही त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी हे आरोप केले.

नवाब मलिक म्हणाले की, “बार मालक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये डील झाल्यानेच सुप्रीम कोर्टात सरकारने बाजू भक्कमपणे मांडली नाही. आघाडी सरकार आलं तर राज्यात पुन्हा डान्सबार बंदी लागू करू.”
याशिवाय, सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू योग्य पद्धतीने मांडली नाही म्हणूनच डान्सबार सुरु होण्यास सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदिल दाखवला अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

navab-malik
याच पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक यांनी डोंबिवली शस्त्र प्रकरणावरूनही भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे आरोपीची पाठराखण करत आहेत. पोलिसांनी चव्हाण यांच्यामुळेच धनंजय कुलकर्णींचा रिमांड मागितला नाही.” इतकेच नाही तर, ‘डोंबिवलीत सापडलेला शस्त्रसाठा विदेशी बनावटीचा आहे. हा साठा भाजपाने आणला असून ही तस्करी आहे का? याचीही चौकशी झाली पाहिजे’ असेही मलिक यांनी म्हटले आहे. यावरच न थांबता, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये अशाच हत्यारांचा वापर झाल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली.