नवाब मलिकांनी रेमडेसिवीर पुरवठ्याबाबतचे पत्रच केले शेअर अन् म्हटले ‘हा घ्या पुरावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे दिसत आहे. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ‘नवाब मलिकांनी जे आरोप केले ते पूर्णपणे निराधार आहेत. जर नवाब मलिकांकडे याचे पुरावे असतील तर आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी’, असे भाजपकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर आता मलिक यांनी एक पत्र शेअर करत म्हटले की ‘हा घ्या पुरावा’.

नवाब मलिक यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या मुद्यावरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते, की ‘केंद्र सरकारकडून रेमडेसिव्हिर निर्यातीवर बंदी घातली गेली आहे. भारतातील 16 निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या 20 लाख रेमडेसिव्हिरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाही. केंद्र सरकार त्यास नकार दिला आहे. भारतात 16 निर्यातदार आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिव्हिरच्या 20 लाख कुपी आहेत. हे उत्पादन करणार्‍या 7 कंपन्यांमार्फतच रेमडेसिव्हिर विकले जावे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

नवाब मलिकांच्या या आरोपानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटले, की नवाब मलिकांनी जे आरोप केले ते पूर्णपणे निराधार आहेत. जर नवाब मलिकांकडे याचे पुरावे असतील तर आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी. सध्याच्या घडीला महाविकास आघाडी सरकारने दोषारोप करणे थांबवावे आणि कठीण काळात स्वत:चे काम करावे असे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर नवाब मलिक यांनी ट्विटर अकाऊंटवरुन एक पत्र शेअर केले आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक मिळत असल्याचा हा आणखी एक पुरावा आहे. केवळ गुजरात राज्यालाच रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या निर्यात कंपनीला मंजुरी देण्यात आल्याचे हे पत्र असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.