‘त्यांनी’ एकनाथ खडसेंकडून क्लास घ्यावा, राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचा फडणवीसांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारने आज बहुमताची यशस्वी चाचणी पार केली आणि आपल्याला १६९ आमदारांचा पाठींबा आहे हे उद्धव ठाकरे यांनी आज सभागृहात सिद्ध केले. भाजपने मात्र सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले तसेच हे कामकाज संविधानिक पद्धतीने होत नसल्याचा देखील यावेळी फडणवीस यांनी आरोप केला. मात्र त्यानंतर अनेक नेत्यांनी बोलताना याबाबत भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांना जर कामकाज कसे चालते हे माहित नसेल तर त्यांनी एकनाथ खडसे यांच्याकडे जाऊन क्लास घ्यावा अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

वारंवार खोटे बोलून काहीही टिकत नाही, हे देवेंद्र फडणवीस यांना समजायला हवे. भाजपकडे १०५ आमदारांचे देखील बळ नाही. अपक्ष असलेले अनेक आमदारांनी देखील भाजपची साथ सोडलेली आहे म्हणूनच भाजपने सभागृहातून पळ काढला अशा शब्दात नवाब मलिक यांनी सभागृहातून बाहेर येताच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्पीकर बदलण्याबाबत बोलताना ही सर्व प्रक्रिया राज्यपालांच्या सहमतीने केली असल्याचे देखील मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.

बहुमत चाचणीचा ठराव जिकल्यानंतर सभागृहात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणार असल्याचे सांगितले. तसेच मी शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराज आणि माझ्या आईवडिलांचे नाव घेतले आणि पुढेही घेत राहणार असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.

 

Visit : Policenama.com