नक्षली हल्ल्यावरून रामदास आठवलेंनी केली मुख्यमंत्र्यांची पाठराखण ,म्हणले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गडचिरोली येथील नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात १६ क्यूआरटी जवान शाहिद झाले . या घटनेनंतर मात्र विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. काही नेत्यांनी तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असे म्हंटले. यावरून रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे चुकीचे आहे असे म्हंटले आहे. बोरिवली गोराई येथे मानवाधिकार संघटनेतर्फे कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

गडचिरोलीत नक्षलवादी हल्ला झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा असे म्हंटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले ,” सरकार कुणाचेही असो नक्षलवादी हल्ल्यासारखी निषेधार्ह घटना घडल्यानंतर जनतेने सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असते.
नक्षलवादी हल्ल्यांसारखी घटना घडते त्यावेळी सरकार आणि विरोधी पक्षाचा एकच सूर असला पाहिजे. काँग्रेस च्या सत्तेच्या काळातही नक्षलवादी दहशतवादी हल्ले झाले होते. त्यामुळे आता नक्षलवादी हल्ला झाला म्हणून सरकार वर टीका करून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागून आपल्यात फूट आहे हे दाखविणे योग्य नाही,” असे आठवलेंनी म्हटले आहे.

जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात १६ जवान शहीद झाले. त्यानंतर, माजी संरक्षणमंत्री आणि खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ज्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांना जबाबदारीची आठवण करुन दिली आहे.