पोलीस समजून शिक्षकाची हत्या ; नक्षलवाद्यांकडून माफीनामा

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन – गडचिरोली शहरातील नगरपरिषद शाळेचे शिक्षक युगेंद्र मेश्राम यांची गोळ्या झाडून नक्षलवाद्यांनी हत्या केली. १० मार्च रोजी नक्षलींनी त्यांच्यावर कोरची तालुक्यात ढोलडोंगरी येथील कोंबड बाजारात गोळ्या झाडल्या होत्या. परंतु त्यांचा हेतू मेश्राम यांची हत्या करण्याचा नव्हता, त्यांना पोलीस समजून गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे.

नक्षलवाद्यांनी आठवडाभरानंतर एक माफीनामा प्रसिद्ध करून चुकीच्या माहितीतून हे घडल्याचे सांगितले आहे. गडचिरोलीतील नगर परिषद शाळेत युगेंद्र मेश्राम हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी कस्तुरबा चंदू देवगडे ही कोरची तालुक्यातील बोटेझरी येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. ते पत्नीला भेटण्यासाठी कोरची येथे गेले होते. कोंबड बाजारात त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. आमच्या शिक्षकाचा काय दोष ? असा सवाल त्यांनी विचारला होता. त्यानंतर नक्षलींनी एक पत्र जारी केले आहे. त्यात मेश्राम किंवा त्यांचा मुलगा आमचे मुळीच लक्ष नव्हते. आमच्या चुकीच्या इंटेलिजन्समुळे ही घटना घडली. मान झुकवून आम्ही आपल्या कुटुंबियांची माफी मागतो, सर्वसामान्यांनी दहशतीत राहू नये. अन्यायकारक व्यवस्थेविरोधात लढा उभारणे आमचे काम आहे. असा आशय पत्रात नमूद करण्यात आला आहे. त्यांनी आरोग्य विभागाचे कर्मचारी, पत्रकार, शिक्षक यांची माफी मागितली आहे.