नक्षलवाद्यांकडून शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या

गडचिरोली : वृत्तसंस्था – येथील ढोलडोंगरीच्या कोंबड बाजारात सशस्त्र नक्षलवाद्यांनी एका शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. योगेंद्र मेश्राम असे या शिक्षकाचे नाव आहे. कोरची पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कोटगुल पोलीस मदत केंद्रातील ढोलडोंगरी येथे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

योगेंद्र मेश्राम हे परिसरातील बोटेजरी येथील कंत्राटी आरोग्य सेविकेचे पती असून गडचिरोली नगर परिषदेच्या जवाहरलाल विद्या मंदिरात कला शिक्षक म्हणून कार्यरत होते. मेश्राम हे दर शनिवार-रविवारला कस्तुरबा चंदू देवगडे या आपल्या पत्नीकडे यायचे. आज नेहमीप्रमाणे ढोलडोंगरी येथे भारलेल्या कोंबड बाजाराला गेले होते. ही संधी साधून नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. हत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या हत्येची नोंद कोटगुल पोलीस मदत केंद्रात करण्यात आली.