गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पुन्हा वाहने पेटवली

गडचिरोली : वृत्तसंस्था – गडचिरोलीत महाराष्ट्रदिनी केलेल्या स्फोटाची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. काल बुधावारी गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील येडसूर- कसनसूर रस्त्यावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. यात पाण्याचा टँकर आणि मिक्सर मशीनची जाळपोळ करण्यात आली.

कंत्राटदारांचे मोठे नुकसान

याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजने आंतर्गत कारका गावालगत गेल्या काही दिवसांपासून काम सुरु आहे. पण

सशस्त्र नक्षलवाद्यांनी मजूरांना काम बंद करण्याचे फर्मान सोडून दोन वाहनांना आग लावली. यात अमरावती येथील एका कंत्राटदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. नक्षलवाद्यांनी गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. 30 एप्रिलच्या रात्री नक्षलवाद्यांनी ३०-३५ वाहने पेटवून दिली होती. त्यावेळी त्यांनी रस्त्याचं काम बंद पाडलं होतं.

महाराष्ट्रदिनी नक्षलवाद्यांकडून स्फोट, १५ जवान शहिद

कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील मंगळवारी तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात १५ जवान शहीद झाले असून खासगी वाहनाचा चालकही ठार झाला.