महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये नक्षलवाद्यांचा धुमाकूळ ; जेसीबी, ट्रॅक्टर पेटवले

पाटणा : वृत्तसंस्था – काल गडचिरोलीत झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असताना आज बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला. नक्षलवाद्यांचा विकासकामांना विरोध असल्याने ३० नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे तीन जेसीबी आणि एक ट्रॅक्टर पेटवून दिले. गया जिल्ह्यातील बाराचट्टी भागात ही घटना घडली. नक्षलवाद्यांच्या या कृत्‍यांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

मिळालेल्या माहितीनुसार, गया जिल्ह्यातल्या बाराचट्टी भागात रस्ते निर्मितीच्या कामासाठी वापरले जाणारे जेसीबी आणि ट्रॅक्टर नक्षलवाद्यांनी पेटवून दिले. वाहनांना आग लावल्‍यानंतर नक्षली झिंदाबादच्या घोषणा देत हे नक्षलवादी घटनास्थळावरुन निघून गेले. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. बाराचट्टी भाग नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. या भागात आधीही अनेकदा नक्षलवाद्यांनी वाहनं जाळली आहेत.

भूसुरुंग IED स्फोटात क्यूआरटीचे १६ जवान शहीद
काल गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १६ जवान शहीद झाले आहेत. ही घटना कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ घडली आहे. हल्ल्यात बळी ठरलेली क्विक रिस्पॉन्स टीम (क्युआरटी) कुरखेडा पोलिस स्टेशनची होती. जवानांची ती टीम पुरादा गावाकडे खासगी वाहनातून चालली होती. काल दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी त्या जवानांच्या वाहनाला लक्ष्य करून स्फोट घडवला.