बोटिंगला गेलेल्या हॉलिवूड अभिनेत्रीचा मृत्यू, आठवड्याभरानंतर सापडला मृतदेह

पोलिसनामा ऑनलाईन टीम – प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री नाया रिवेरा बोटिंगला गेली असता बेपत्ता झाली होती. अखेर काल तिचा मृतदेह सापडला आहे. 8 जुलै रोजी ती सकाळी कॅलिफोर्नियातील पिरु तलावात बोटिंगसाठी गेली होती. मात्र या तलावात फिरताना ती गायब झाली होती. या तलावाच्या ईशान्य भागात तिचा मृतदेह सापडल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

बोटिंग करताना नायासोबत तिचा चार वर्षांचा मुलगादेखील होता. मुलगा बोटीमधून किनार्‍यावर परतला, मात्र नाया गायब झाली होती. आई आणि मी बोटीतून फिरायला गेलो होतो. तलावात गेल्यावर आम्ही दोघांनी पाण्यात पोहण्यासाठी उडी मारली. त्यानंतर आईने मला पुन्हा बोटीत चढण्यासाठी मदत केली. पण बोटीत आल्यावर जेव्हा मी मागे वळून पाहिले तेव्हा आई दिसलीच नाही, अशी माहिती तिच्या चार वर्षीय मुलाने दिली आहे.

नायाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. नाया बेपत्ता झाल्याची माहिती कळताच आठवडाभरापासून पोलीस स्कूबा एक्स्पर्ट आणि हॅलिकॉप्टर्सच्या साहाय्याने तिचा शोध घेत होते. तिच्या एकाएकी मृत्यूमळे हॉलिवूड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत.