Mumbai News : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ड्रग्जचा कारखाना उध्दवस्त, NCB ची मुंबईतील आजवरची सर्वात मोठी कारवाई

मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून डोंगरी भागात आजवरची मुंबईतील सर्वात मोठी कारवाई केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ड्रग्जचा कारखाना उद्धवस्त केला आहे. डोंगरी भागात अनेक ठिकाणी एनसीबीने छापे मारले असून त्यात काही हत्यारे आणि १० कोटी रुपयांचे रोकड जप्त करण्यात आली आहे.

दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि करीम लाला याचा नातेवाईक चिंकू पठाण याला एनसीबीने बुधवारी घणसोलीतून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडील चौकशीत एनसीबीला अनेक महत्वाची माहिती मिळाली. त्यावरुन एनसीबीने काल संपूर्ण रात्रभर डोंगरी भागात अनेक ठिकाणी छापेमारी केली. त्यात किमान १० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील ड्रग्जचे कनेक्शन समोर आले होते. त्यानंतर मुंबईतील एनसीबी ही कार्यरत झाली होती. बॉलीवूडमधील अनेक अभिनेते, अभिनेत्री यांच्याकडे एनसीबीच्या अधिकार्‍यांनी चौकशी केली. त्यातून त्यांना ड्रग्ज सप्लाय करणार्‍यांची साखळी समोर आली. या सप्लायरांना अटक करुन पोलीस एक एक साखळी जोडत गेले. त्यातूनच याचा माग अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमच्या हस्तकापर्यंत पोहचला आहे.