NCB कडून समीर खानच्या घरावर छापे, मंत्री नवाब मलिकांनी सोडलं मौन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज खरेदीप्रकरणी बुधवारी एनसीबीने (NCB) अटक केली. 200 किलो ड्रग प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला 20000 रुपये गुगल पे केल्याने मलिक यांचे जावई समीर खान एनसीबीच्य़ा (NCB) रडारवर आले होते. समीर यांना अटक केल्यानंतर एनसीबीने आणखी काही ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये समीर यांचे वांद्रे येथील घर आणि कार्यालयावरही छापे टाकण्यात आले. यानंतर बुधवारी दिवसभरापासून या विषयावर काहीच न बोलले नवाब मलिक यांनी आज मौन सोडले आहे. छापेमारीचे वृत्त पसरताच मलिक यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये मलिक म्हणतात की, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो. तसेच कोणताही भेदभाव न करता कारवाई व्हायला हवी. कायदा त्याचे काम करेल, मला न्यायसंस्थेवर विश्वास आहे.

एनसीबीने ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक केलेल्या ब्रिटिश नागरिक करण सजनानीशी त्यांचा ड्रग्ज तस्करीतून आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपातून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यापूर्वी या अनुषंगाने त्यांची सुमारे दहा तास सखोल चौकशी करण्यात आली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच शनिवारी अटक केलेल्या सजनानी व अन्य दोन तरुणींकडून एनसीबीने सुमारे २०० किलो परदेशी गांजा जप्त केला आहे. करणच्या खात्यावर समीर खान यांच्याकडून ऑनलाइन २० हजार रुपये पाठविण्यात आले होते. त्यामुळे खार परिसरात राहत असलेल्या समीर यांना चौकशीसाठी समन्स बजाविले होते.

या प्रकरणाबाबत बेलार्ड पियार्ड येथील एनसीबीच्या कार्यालयात सकाळी १० वाजेपासून त्यांची चौकशी सुरू होती. आर्थिक अडचण असल्यामुळे त्याला पैसे दिले होते, असा खुलासा त्यांनी केला. मात्र, त्याबाबतचा सबळ पुरावा ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे सुमारे ८ वाजेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली आहे.