NCB ची मुंबईसह ठाण्यात मोठी कारवाई ! 43 किलो गांजा अन् 20 लाखांची रोकड जप्त

पोलीसनामा ऑनलाइन टीम – NCB ने मुंबई आणि ठाण्यात विविध ठिकाणी छापा टाकून रविवारी (दि. 18) तिघांना अटक केली. अटक केलेल्याकडून 220 ग्रॅम एमडी आणि 43 किलो गांजासह 20 लाख 5 हजारांची रोकड जप्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांचा वाढता वापर रोखण्यासाठी NCB ने मुंबईत छापेमारीचे सत्र सुरु केले आहे. गुरुवारी (दि. 15) एनसीबीने डोंबिवलीतील हायड्रोपोनिक उत्पादनाच्या दुकानातून दोन ड्रग पेडलर्सना अटक केली होती.

सरफराज पप्पीवर, सनी परदेशी आणि अजय नायर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, NCB ने गुप्त माहितीच्या आधारे सरफराज पप्पी याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून 65 ग्रॅम एमडी ताब्यात घेतले. तसेच घरातून 2 लाख 15 हजार रुपयेही जप्त केले. त्याच्यावर यापूर्वी एनसीबीने एनडीपीएस प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. घटनास्थळी चौकशीदरम्यान त्याने खुलासा केला की, नागपाडा येथील समीर सुलेमान शमा याने एमडी पुरविला होता. एनसीबीने माहितीवरुन समीरच्या घराची झडती घेतली आणि 17 ग्रॅम एमडी व 90 हजार रुपये जप्त केले. समीर सुलेमान घरात हजर नव्हता, मात्र NCB त्याचा शोध घेत आहे. तर बदलापूर येथे एका घरातून 43 किलो गांजा जप्त केला आहे. सनी परदेशी आणि अजय नायर या संशयितांना पकडले. कुणाल कडू या व्यक्तीकडून गांजाची खरेदी केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. हा गांजा ओडिशातून खरेदी केल्याचे समोर आले आहे. ओडिशाचा मुख्य सूत्रधार आणि पुरवठादार शोधण्यासाठी एनसीबी तपास करत आहे.