NCB कडून अभिनेता अर्जुन रामपालची 7 तास चौकशी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन (drug-connection) समोर आले आहे. ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याची NCB कडून सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे तब्बल 7 तास कसून चौकशी करण्यात आली. पण उद्या पुन्हा त्याला चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याचे NCB च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.

चौकशी पूर्ण झाल्यानंतर एनसीबी कार्यालयाच्या बाहेर आल्यानंतर अर्जुनने माध्यमांशी संवाद साधला. मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन रामपालने सांगितले की, एनसीबी चांगलं काम करीत आहे. मी अमली पदार्थ विरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीला सहकार्य करीत आहे. माझा ड्रग्जशी काहीही संबंध नाही. घरी जे औषधे सापडले आहेत त्याचे प्रिस्किप्शन देण्यात आले आहे. ड्रग्ज प्रकरणात ज्या लोकांची चौकशी केली जात आहे ते माझ्या वर्तुळातील असल्याने माझीही चौकशी केली जात आहे.

एनसीबीने आज सकाळी अर्जुनचा जवळचा मित्र पॉल ग्रियाड (Paul Griyad) याला अटक केली आहे. एनसीबीने पॉलची गुरुवारी चौकशी केली होती. त्यानंतर आज त्याला अटक केली. त्याची आणखी चौकशी केली जाणार आहे. पॉल हा एक ऑस्ट्रेलियन आर्किटेक्ट आणि मुंबई येथे राहणारा व्यापारी आहे. पॉल हा अर्जुन रामपालचा जवळचा मित्र आहे. अर्जुनच्या गर्लफ्रेंडचा भाऊ अ‍ॅगिसिलास डीमेट्रिएड्स (Agisilaos Demetriades) याच्याशी पॉलचा व्यावसायिक व्यवहार होता. एनसीबीने दावा केला आहे की, पॉल अ‍ॅजिसिलोसकडून बंदी असलेली औषधं खरेदी करीत होता. या प्रकरणात अटक करण्यात येणारा पॉल हा दुसरा परदेशी नागरिक आहे.