‘गली गली मे शोर है, मोदी सरकार चोर है’ : ‘मोदी’वडे तळत ‘या’ पक्षाची घोषणाबाजी

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – साताऱ्यात राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी, महिला व जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने बेरोजगारीच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. गली गली मे शोर है, मोदी सरकार चोर है, या मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, वडापाव वाले… घ्या मोदी वडा, मोदी सरकारची भजी घ्या, अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आल्या. इतकेच नाही तर, आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी मंडपातच चुलीवर भजी व वडे तळले. यानंतर हे वडे त्यांनी विकलेसुद्धा आणि यातून त्यांनी मोदींच्या धोरणांचा निषेध नोंदविला.

देशातील वाढत्या बेरोजगारीचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने वाढलेल्या बेरोजगारीच्या निषेधार्थ राज्यभर आज ‘जवाब दो.. जॉब दो’ आंदोलन केले आहे. याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यात कार्यकर्त्यांनी वडे तळून ते विकले आणि मोदींविरोधात घोषणाही दिल्या. मंडपात वडा व भजी तळून मोदी वडा घ्या…, मोदी सरकारची भजी घ्या…, म्हणत भजी व वड्यांची विक्री केली.

यावेळी सुनिल माने यांनी आपल्या भावना मांडल्या. ते म्हणाले की, “नोटाबंदीनंतर दोन वर्षांत सव्वा कोटी लोक बेरोजगार झाले. नवे रोजगार निर्मितीत भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे.” अयाबाबतची आकडेवारी सरकारी सर्वेक्षणात पुढे आली आहे. मोदी सरकारने सत्तेवर येताना दोन कोटी युवकांना रोजगार देऊ, अशी घोषणा केली होती. मात्र, सरकार आश्‍वासने पूर्ण करू शकलेले नाही. त्यामुळे हे अपयश मान्य करण्याऐवजी निर्लज्जपणे खोटी आकडेवारी जनतेच्या तोंडावर फेकत आहे. तरुणांतील रोष व असंतोषाला वाचा फोडणसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे बेरोजगारी विरोधात धरणे आंदोलन केले आहे.’’ असे ते म्हणाले.

‘आम्ही राष्ट्रवादीचे नोकर नाही’

आंदोलन करताना राष्ट्रवादीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटच्या बाजूला मंडप उभारला होता. शिवाय त्यावर बॅनर व झेंडे लावले होते. परंतु हे आंदोलन संपले आणि यानंतर मात्र युवक व विद्यार्थी सेलचे पदाधिकारी यांनी मोबाईलवरून सदर बॅनर व झेंडे काढण्यासाठी सांगितले. यानंतर त्यांच्या सूचनेचे पालन करत काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी हे झेंडे काढले. परंतु काही झेंडे आणि बॅनर तसेच लावलेले होते. यामुळे आता उर्वरीत काम कोण करणार असा वाद यावेळी रंगलेला दिसून आला. यानंतर एक ज्येष्ठ पदाधिकारी मात्र या गोष्टीला वैतागला. वैतागून त्याने आम्ही राष्ट्रवादीचे नोकर नाही… पदाधिकारी आहोत, असे युवक, विद्यार्थी, सेलच्या पदाधिकाऱ्याला सुनावले.

या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे अध्यक्ष तेजस शिंदे, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष अतुल शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव, कार्याध्यक्षा जयश्री पाटील यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी व युवक, युवती आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. याशिवाय या आंदोलनात श्री. माने व तेजस शिंदे यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव चव्हाण, दत्तात्रेय उत्तेकर, ॲड. नितीन भोसले, गोरखनाथ नलवडे, मंगेश ढाणे, सागर जगताप, सनी शिर्के, मारुती इदाटे, उद्धव बाबर, पांडुरंग पोतेकर, राजेंद्र लवंगारे, कविता मेणकर, नंदिनी जगताप, सविता शिंदे, शफिक शेख, सागर कांबळे, सतीश माने, सचिन कुराडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनस्थळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सभापती राजेश पवार, मनोज पवार, पक्षप्रतोद सुरेंद्र गुदगे, जयवंत भोसले, राजाभाऊ जगदाळे, संजय साळुंखे, संभाजीराव गायकवाड आदींनी भेट देऊन सहभाग नोंदविला.