‘त्या’ सोहळयात अजित पवार अन् श्रीरंग बारणे एकाच व्यासपीठावर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीचे तिसर्‍या टप्प्याचे मतदान काल (दि.२३) रोजी झाले. आता चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघांमध्ये गडबड चालु आहे. पुणे जिल्हयातील पुणे लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाले असले तरी जिल्हयातील मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघात दि. २९ रोजी मतदान होणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघातुन शिवसेना-भाजप महाआघाडीकडून श्रीरंग बारणे हे उमेदवार आहेत तर त्यांच्याविरूध्द काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेस महाआघाडीचे पार्थ अजित पवार हे निवडणुक लढवित आहेत.

मतदार संघातील प्रचार हा शिगेला पोहचला असतानाच आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे वडिल आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे एकाच व्यासपीठावर आल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या गेल्या. मावळ मधील कान्हे फाटा येथे रविंद्र भेगडे यांच्यावतीने आज २३५ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. त्या सोहळयाला अजित पवार, श्रीरंग बारणे, मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्यासह इतर मोठे नेते उपस्थित होते. मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवार आणि श्रीरंग बारणे एकाच व्यासपीठावर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.