Pune News : पुन्हा कोल्हापूरला जाणार म्हणणार्‍या चंद्रकांत पाटलांना अजित पवारांचा खरमरीत टोला, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमामध्ये भाजपचे (BJP_ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत आपण पुन्हा कोल्हापूरला जाणार असल्याचे जाहीर केले. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. पुणे विधान भवन येथे अजित पवारांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.

अजित पवार यांनी म्हटले की, सरकार नाही त्यामुळे त अस्वस्थ आहेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवलंही नव्हतं. आमच्या भगिनी मेघा कुलकर्णी, कार्यकर्ते उगाच नाराज झाले, असे अजित पवार म्हणाले.

मग आलेच कशाला ? कोल्हापुरातच थांबायचं
अजित पवार पुढे म्हणाले, निवडणुकीत कोणी कुठे उभे राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक वर्ष होण्याआधीच परत जाण्याची भाषा करु लागले आहेत. लोकांनी तुम्हाला पाच वर्षासाठी निवडून दिले आहे. कोथरुडची कामं व्हावीत अपेक्षा आहे. उद्या लोक कामं घेऊन आले तर त्यांना मी परत जाणार आहे असे सांगतील. मग आले कशाला ? कोल्हापूरातच थांबायचं होतं, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

आमदारांना घेताना उकळ्या फुटत होत्या
भाजपचे आमदार संपर्कात असल्याचे मी म्हटलेलं नाही. काळजी घ्या तुम्ही मागच्या वेळी फोडाफोडी केली. सरकार येणार नाही, आपली कामं होणार नाहीत यासाठी ते गेले. तिथं कामं होत नसतील तर ते परत दुसरीकडे जातील एवढच मी म्हटले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तीन चार महिन्यात काही गोष्टी घडू शकतात असे म्हटलं तर त्यांना राग आला. त्यांनी इतर पक्षातील आमदार घेताना उकळ्या फुटत होत्या, बरं वाटत होतं… आता कसं वाटतंय तर गार गार वाटू लागलं आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

मराठा आरक्षण कोर्टात टिकावं यासाठी प्रयत्नशील
मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, कोणताही निर्णय घेताना दोन मतप्रवाह दिसतात. काहीजण निर्णयाचं समर्थन करतात तर काहीजण विरोध. हा ज्यांचा त्यांचा अधिकार आहे. मराठा आरक्षण प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. यावर जानेवारी महिन्यात सुनावणी होणार असून राज्य सरकार आरक्षण टिकावं यासाठी प्रयत्नशील असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.