नेते किंवा आमदार सोडून गेल्याने पक्ष संपत नाही : अजित पवार

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी काल घड्याळाची साथ सोडत शिवधनुष्य हाती घेतल्यानंतर आता आणखी काही आमदार शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काल अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता आमदार वैभव पिचड हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहे. त्यानंतर आता राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केले आहे.

सोडून जाणाऱ्या आमदार आणि नेत्यांमुळे राष्ट्रवादी अजिबात निराश नसून काही नेते आणि आमदार पक्ष सोडून गेल्याने पक्ष संपत नसतो असे ते यावेळी म्हणाले. सातारा येथे बोलताना त्यांनी हे भाष्य केले आहे. यावेळी सत्ताधारी पक्षावर टीका करताना ते म्हणाले कि, आमदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातच असतात. यामागे फक्त स्वार्थ असतो. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हि पक्षांतर काही नवीन नाहीत. त्यामुळे जो पक्ष या निवडणुकीत १४५ आमदारांचा आकडा गाठेल तो पक्ष सत्तेत बसेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर कर्नाटकातील सत्तासंघर्षांवर देखील त्यांनी भाष्य केले.

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात आमदार पक्ष बदलत आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील अनेक आमदार संपर्कात असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर नवनियुक्त भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील लवकरच डझनभर आमदार पक्षात प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता नेमके किती आमदार राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याविषयी अधिक बोलताना अजित पवार म्हणाले कि, यापूर्वी शिवसेनेच्या १९ आमदारांनी पक्ष सोडला होता. त्यामुळे त्यांना काही फरक पडला नाही किंवा शिवसेना काही संपली नाही.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची जोरदार तयारी सुरु असून या निवडणुकीत पक्ष तरुण आणि नवीन चेहऱ्यांना संधी देणार असून आघाडीने यावेळी १७५ जागा निवडून आणण्याचे लक्ष ठेवले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त