अजित पवारांनी भरसभेतच भरला ‘दम’, म्हणाले – ‘माझी सटकली तर तुझी वाट लागेल’

कर्जत : पोलीसनामा ऑनलाइन – नवा रस्ता बांधून झाल्यावर जर एका पावसात तो खराब झाला, तर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाईल. तसेच कोणता अधिकारी चिरीमिरी मागत असेल तर त्याचे नाव मला सांगा, मी बघतो त्यांच्याकडे, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच यावेळी त्यांनी सर्कल अधिकार्‍यांना थेट दम देत म्हटले, सर्कल अधिकार्‍यांना सांगतोय माझी सटकली तर तुझी वाट लागेल. कर्जत जामखेडमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

महिला सुरक्षेबाबत बोलातना ते म्हणाले की, राज्यात महिलांच्या सुरेक्षेसाठी कडक कायदा आम्ही करणार आहोत. यापुढे मुलींकडे वाकड्या नजरने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही. शिवाय, विधानसभा, लोकसभेतही महिलांना आरक्षण देण्याची मागणी आम्ही करणार आहोत. मात्र यासाठी देशपातळीवर एकमत आवश्यक आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, आम्ही फक्त बोलत नाही, तर करून दाखवतो. कर्जत-जामखेड मतदारसंघातून तुम्ही रोहित पवार यांना निवडून दिले आहे. आता तुमची जबाबदारी संपली, आमची सुरू झाली आहे. कर्जत जामखेड हा माझा आवडता मतदारसंघ आहे, या तालुक्याशी माझे भावनिक नाते आहे. १२ पैकी ९ जागा निवडून दिल्या बद्दल अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार. तुमचं नाणं खणखणीत आहे ते आम्ही वाजवणारच, असेही अजित पवार म्हणाले.

सीएएवर अजित पवार म्हणाले, सीएए, एनआरसीचा महाराष्ट्रात कोणालाही, कोणत्याही समाजाला त्रास होणार नाही, याची खात्री आमचे सरकार देत आहे. कोणाच्या सागंण्यावर जाऊ नका, कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही. आम्ही जोपर्यंत सरकारमध्ये आहे तोपर्यंत तुमच्या केसाला धक्का लागणार नाही असा शब्द मी देतो.