निवडणूक कार्यालयातच राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, खुर्च्यांने केली मारामारी

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. वाद होऊ नये यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, भिवंडी तालुक्यातील 56 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांना तुफान राड्याने सुरुवात झाली आहे. सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कर्यकर्त्यांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच तुफान राडा झाला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धाऊन जात एकमेकांना खुर्च्यांनी मारामारी केली.

भिवंडी तालुक्यातील भादवड येथील निवडणूक कार्यालयात निंबवली गावातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार समोर येताच निवडणुकीच्या वादातून दोघांनी चांगलाच राडा केला. निवडणूक कार्यालयात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. काही वेळाने बाचाबाचीचे रुपांतर हाणामारी झाले. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली. एवढेच नाही तर अधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आलेल्या खुर्च्या एकमेकांच्या दिशेने भिरकावत खुर्च्यांनी मारहाण केली.

गणेश गुळवी आणि प्रविण गुळवी या दोघांना एकच चिन्ह आल्यामुळे दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. यानंतर याचे रुपांतर हाणामारीत झाले. विशेष म्हणजे दोघेही नातेवाईक असून एकाच कुटुंबातील आहे. निवडणुक सुरु झाल्यापासून ही चौथी घटना आहे. पहिली घटना गुदवली येथे चौघांना मारहाण झाली. त्यानंतर काल्हेरचे शिवसेनेचे शाखा प्रमुख यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तर खारबाव येथे कार जाळण्याचा प्रयत्न झाला. तर मंगळवारी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.