विधानसभेसाठी राष्ट्रवादीची ‘चाणक्य’निती : जाणून घ्या राष्ट्रवादी-काॅंग्रेस पक्षाची ‘निती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला मात्र लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभेच्या उमेदवारांसोबत चर्चा केली.

राष्ट्रवादी जास्त जागांची मागणी करणार
यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि मनसे फॅक्टर याबद्दलही नेत्यांनी शरद पवारांशी चर्चा केली. या विधानसभा निवडणुकीत मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा मागण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने चालवली आहे. २००९ साली राष्ट्रवादी पक्षाने ११४ विधानसभेच्या जागा लढवल्या होत्या आणि काँग्रेसने १७४ जागा लढवल्या होत्या पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राष्ट्रवादी जास्त जागांची मागणी करेल, अशी शक्यता आहे.

महिला आणि तरुणांना संधी मिळणार
जो जिंकणारा उमेदवार आहे त्याला ती जागा दिली पाहिजे, असा निष्कर्ष या बैठकीत निघाला. कुणाचे कोणते पारंपरिक मतदारसंघ आहेत हे न पाहता जो उमेदवार मतदारसंघ जिंकेल त्याला प्राधान्य द्यायचं, अशी राष्ट्रवादीची भूमिका असेल, अशी माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी शरद पवारांची भूमिका आहे.

विधानसभा निवडणूक काँग्रेससोबत एकत्र लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे, असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितलं. या निवडणुकीत महिला आणि तरुणांना जास्त संधी देणार, असं ते म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार नाही, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची ही मॅरेथॉन बैठक झाली. यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.