पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा बहिष्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज (गुरुवार) करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना उपराष्ट्रपतींचे पुणेकरांच्यावतीने स्वागत करायचे होते, परंतु त्यांचे स्वागत करु दिले नाही. तसेच पोलिसांनी काही पदाधिकाऱ्यांना अटक केली. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

या विषयी पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले की, महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपराष्ट्रपती पहिल्यांदाच या शहरात येत आहेत. त्यामुळे आम्हाला राष्ट्रवादीच्यावतीने उपराष्ट्रपतींचे स्वागत करायचे होते. मात्र पोलिसांनी आम्हाला इमारतीच्या प्रवेशव्दाराजवळ न थांबू देता दूर ठेवले. आम्ही कोणत्याही प्रकारचे आंदोलन करणार नाही, आम्हाला फक्त स्वागत करायचे आहे असे सांगून ही पोलिसांनी आम्हाला दूर ठेवले आणि आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली. ही निषेधार्थ बाब आहे. इमारतीच्या कोनशीलेवर ज्यांच्या हस्ते इमारतीचे भुमीपुजन झाले त्यांचेही नाव टाकण्यात आले नाही. हा सत्ताधाऱ्यांचा करंटेपणा आहे. अशा शब्दात चेतन तुपे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

पुणे महानगरपालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीचे उद्घाटन आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, नॅशनल शिपिंग बोर्डचे अध्यक्ष प्रदीप रावत आदी यावेळी उपस्थित होते.