विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून ‘या’ 7 नावांवर ‘शिक्कामोर्तब’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून प्रचाराच्या रणधुमाळीबरोबरच जागावाटपाची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. सत्ताधारी शिवसेना भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात देखील सध्या जागावाटपावर चर्चा सुरु आहे. मात्र आता जागावाटपाच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीटवाटपात आघाडी घेतली असून त्यासाठी त्यांनी सात उमेदवारांची नावे नक्की केल्याची माहिती मिळत आहे.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली होती. यामध्ये विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. त्याचबरोबर प्रचार कशाप्रकारे असावा यावर देखील चर्चा झाल्याचे समजते. त्याचबरोबर काही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे.

या नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब
या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, शशिकांत शिंदे, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे.
त्याचबरोबर जागावाटपासंदर्भात देखील या बैठकीत चर्चा आल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्यात असून लवकरच घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर आघाडीच्या प्रचाराचा नारळ देखील लवकरच फुटण्याची देखील शक्यता आहे.