राष्ट्रवादीला आणखी धक्का ? कोणत्याही परिस्थितीत प्रताप ढाकणे विधानसभा लढविणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा उमेदवारीसाठी मुलाखत देणारे प्रताप ढाकणे यांनी आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढण्याचा निश्चय जाहीर केला आहे. त्यांनी हा एक प्रकारे पक्षाला इशाराच दिला आहे, असे बोलले जात आहे. या मतदारसंघातून माजी आमदार चंद्रशेखर घुले हे इच्छुक असताना ढाकणे यांनी इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यासह नगर जिल्ह्यातही एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. शेवगाव-पाथर्डी मतदार संघात पक्षाचे प्रताप ढाकणे यांनी आज कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी पक्ष कोणताही असला, तरी विधानसभा निवडणूक लढणार, असे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी गोची झाली आहे.

दोन दिवसापूर्वी ढाकणे यांनी विधानसभा उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती. या मतदार संघात माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनीही मुलाखत दिलेली आहे. ढाकणे यांनी इशारा देऊन पक्षावर दबाव वाढविला आहे. त्यांना उमेदवारी न दिल्यास ते बंडखोरी करतील, अशी शक्यता आहे. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्षाचे आमदार मोनिका राजळे या करीत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर घुले हे या मतदारसंघातून इच्छुक असताना ढाकणे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

आरोग्यविषयक वृत्त