‘हा’ पक्ष करतोय उमेदवारासाठी चाचपणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला तयार नाही. मात्र पक्षाकडे अजून निश्चित उमेदवार नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली होती. मात्र त्यांचा प्रवेश स्थगित करण्यात आल्यापासून नागवडे गट बघ्याच्या भूमिकेत होता.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी काँग्रेसमधील थोरात गटाच्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारीसाठी ऑफर दिली होती. काँग्रेसमधील निष्ठावंत व्यक्तीला फोडून विखे यांना शह देण्याचा हा प्रयत्न होता, असे बोलले जात आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी नगर लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची मते जमाविण्यास सुरुवात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित करण्यात आला होता. त्यासाठी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी मुंबईला नेण्याचे नियोजनही करण्यात आले होते.

तशी बैठकही श्रीगोंद्यात झाले होती. मात्र बैठकीतच जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी नागवडे यांचा प्रवेश तूर्त स्थगित केल्याचे सांगितले होते. त्यानंतर नागवडे यांचे नाव लोकसभा निवडणुकीच्या चर्चेतून मागे पडले होते. तसेच मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेणेही बंद केले आहे. मात्र आता पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहील, असे जाहीर केले आहे. त्यामुळे आज दुपारी डॉ. सुजय विखे हे त्यांच्या समर्थकांसमवेत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीने नगरची जागा सोडली नाही. मात्र उमेदवार कोण असेल, हे गुलदस्तातच आहे. अनुराधा नागवडे यांच्या नावाची चर्चा केली असली, तरी अजून कोणाचीही उमेदवारी निश्चित केली नाही. त्यामुळे राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.