पवारांचं कौतुक केल्यानंतर पंकजा मुंडेही भाजपामधून बाहेर पडण्याची चर्चा, चंद्रकांत पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन :  भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे प्रमुख शरद पवार (NCP chief Sharad Pawar) यांचे जाहीर कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. एकनाथ खडसेंनंतर पंकजा मुंडेही पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे दावे होऊ लागले. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Maharashtra BJP chief Chandrakant Patil) यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा निघाला. कामगारांना 14 टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीला भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेसुद्धा उपस्थित होते. यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवारांना सलाम केला होता.
चंद्रकांत पाटलांना यावरुन त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत असे विचारले असता ते म्हणाले की, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मीदेखील अनेक वेळा शरद पवार या वयात किती प्रवास करतात, शेती आणि सहकार विषयातल ज्ञान यासंबंधी सांगत असतो. आम्ही मंत्री असताना सामान्यांसाठी फोन करुन ते चर्चा करायचे. आता चांगल्याला चांगल म्हणणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आम्ही ती उचलली आहे. पण महाविकास आघाडीने उचलली नाही असे ते म्हणाले.

पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं होत
शरद पवार साहेब hats off करोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले. पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला आहे.