राष्ट्रवादीच्या दोघांनी ‘एबी’ फॉर्म सह भरला अर्ज, पिंपरी मतदार संघात राष्ट्रवादीने रात्रीत उमेदवार बदलला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेसने काल जाहीर केलेली उमेदवारी रात्रीत बदलून माजी आमदार अण्णा बनसोडे यांना दिली. मात्र शुक्रवारी पहिली उमेदवारी जाहिर झालेल्या सुलक्षणा शिलवंत-धर आणि नंतर उमेदवारी जाहीर झालेले अण्णा बनसोडे या दोघांनी पक्षाकडून अर्ज दाखल केले आहेत. तर माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी गुरुवारी जाहीर केली होती. त्यामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नगरसेविका सुलक्षणा धर यांना जाहीर झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ नाराज झाले होते. दोघांनीही पत्रकार परिषद घेऊन बंडाचा इशारा दिला होता. आपण अपक्ष लढणार असल्याचे बनसोडे यांनी जाहीर केले. माजी आमदार बंडखोरी करणार असल्याने पक्षातील घडामोडींना वेग आणि रात्रीत उमेदवार बदलण्याचा निर्णय घेत बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी राष्ट्रवादी वतीने उमेदवारी मागितली होती, परंतु राष्ट्रवादी वतीने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत शक्तिप्रदर्शन करीत मोठ्याप्रमाणात रॅलीचे आयोजन केले होते.

राष्ट्रवादी पक्षाकडून दोघांनी अर्ज दाखल केले आहेत. पहिली उमेदवार बदलून मला पक्षाने उमेदवारी दिली आहे. मी प्रथम अर्ज दाखल केला असल्याने तो ग्राह्य असेल असे बनसोडे यांनी सांगितले. 7 तारखेला अर्ज कोण माघार घेणार हे स्पष्ट होणार आहे.

visit : Policenama.com