महाराष्ट्रात 15 दिवसांचा Lockdown लावा, भुजबळांची मागणी; मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 30 एप्रिल पर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा मोडकळीस आली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य सरकार पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेतील अशी माहिती दिली आहे. तर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात कडक लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

आज (मंगळवार) मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. यावेळी राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल. तसेच लॉकडाऊनसंबधी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीत आपण 10 ते 15 दिवांचा लॉकडाऊन लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

छगन भुजबळ यांनी सांगितले, सध्या ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांची जेवढी आवश्यकता आहे तेवढे उपलब्ध होत नाही. त्यामुळे आता विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन आणावा लागत आहे. मला असे वाटते जर 10 ते 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन केला तर इतर सर्व गोष्टी, साधानसामुग्री एकत्र करण्यास वेळ मिळेल. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल.

कोरोनाची साखळी तोडणे आणि सुविधा वाढवून लोकांना वाचवणं या दोन मार्गांनी काम केले पाहीजे. कडक निर्बंध असताना देखील लोक कारण काढून फिरत आहेत. 8-10 दिवसांनी लोकांना काही अडचण होणार नाही. सहा ते आठ महिन्यांचा लॉकडाऊन नको. मात्र 15 दिवसांचा लॉकडाऊन केला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना सांगितले असून आज पुन्हा एकदा त्यांच्या समोर लॉकडाऊनचा मुद्दा मांडणार आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.