मुख्यमंत्र्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असती तर राजीनामा दिला असता : शरद पावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १६  जवान शहीद झाले आहेत. या घटनेचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निषेध करत गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केलेली आहे.महाराष्ट्रदिनी नक्षलवाद्यांनी  घडवलेल्या भूसुरुंग स्फोटाविषयी तीव्र प्रतिक्रिया देत शरद पवारांनी ट्विट केले आहे. यामध्ये शरद पवार म्हणाले आहेत की, ‘महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या कारवाया नित्याची बाब झाली आहे. राज्यकर्त्यांकडून नक्षलग्रस्त भागातील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे. महाराष्ट्र दिनी गडचिरोलीतील जांभूरखेडा भागात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात १६ एसआरपीएफ जवान मृत्यूमुखी पडले.

या घटनेवरून पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.  या घटनेची जबरदारी स्वीकारून व गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे त्यांनी ट्विटमधून सूचित केले आहे. राजीनाम्याची मागणी करताना शरद पवार म्हणाले आहेत की, ‘गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही.

तसेच या घटनेचा निषेध करताना पवार यांनी ट्विट केले आहे की, ‘सबब नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व मृत्यूमुखी पडलेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

नक्षलवाद्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा डांबर प्लॉंट व ३६ हून अधिक गाड्या जाळल्यांची घटना पहाटे घडल्यानंतर त्या ठिकाणी जात असलेल्या क्यूआरटी पथकला भूसूरुंग स्फोट करून उडवून लावल्याची घटना घडली आहे. ही घटना कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ घडली आहे. दरम्यान, या घटनेत १६ हून अधिक क्यूआरटीचे जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.