शरद पवारांकडून अचानकपणे नाशिक दौरा रद्द, उद्या 16 मंत्र्यांसह महत्वाची बैठक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर जाणार असताना ते दौरा रद्द करून मुंबईला गेले. पवारांनी उद्या राष्ट्रवादीच्या १६ मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात मतभेद निर्माण होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर मंत्र्यांची बैठक बोलावली असल्याची चर्चा होत आहे.

पवार हे राज्यातील वकिलांच्या परिषदेच्या समारोप कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये येणार होते. त्यासाठी सकाळी ११ वाजता ते राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांची भेटही घेणार असल्यामुळे कार्यकर्तेही भवनात जमा झाले होते. पण जळगावमधून खास हेलिकॉप्टर ते नाशिकजवळील आडगावमधल्या भुजबळ नॉलेज सिटीच्या हेलिपॅडवर आल्यावर त्वरित ते मुंबईकडे रवाना झाले.

शरद पवार यांची राज्य सरकारने एसआयटीच्या माध्यमातून एल्गार प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी करत मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवले होते. त्यानंतर काही दिवसात हा तपास एनआयएकडे सोपवला गेला.

एल्गार प्रकरणाचा तपास राज्य सरकारने करावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली असतानाही ठाकरे यांनी हा तपास एनआयएकडे सोपवला. त्यामुळे पवार यांनी नाराजी व्यक्त केली असून केंद्राचा निर्णय योग्य नसून मुख्यमंत्र्यांचा निर्णय तर त्याहूनही अयोग्य आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.