शेतकर्‍यांना फायदा होतो म्हणूनच ‘यांना’ पोटशूळ उठला होता : शरद पवार

नांदेड : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले असून उमेदवार शोधण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर येणार आहे. मात्र त्यानंतर आता पक्षाध्यक्ष शरद पवार हे संपूर्ण राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर होणारी हि पडझड रोखण्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले आहेत.

नाशिकमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर आता शरद पवार राज्याचा दौरा करत आहेत. नाशिक, बीड दौऱ्यानंतर आता शरद पवार नांदेड दौऱ्यावर पोहोचले असून त्यांनी या ठिकाणी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी बोलताना पवार म्हणाले कि, आमच्या सत्ताकाळात भारत हा जगात सर्वाधिक कृषी मालाची निर्यात करणारा देश होता. मी कृषिमंत्री असताना हे भाजपवाले कांद्याच्या माळा घालून येत होते. त्यामुळे भाव वाढले म्हणजे शेतकऱ्याला फायदा होतो, म्हणून यांना पोटशूळ उठला होता, असा घणाघात त्यांनी भाजपवर केला.

दिल्ली यांची, मुंबई पण यांची अन् सर्वाधिक टीका मात्र माझ्यावर करतात

भाजपवर टीका करताना शरद पवार पुढे म्हणाले कि, दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांची सत्ता असून माझ्यावर टीका करत असल्याचे देखील पवारांनी म्हटले. त्याचबरोबर शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात संकटात असल्याचे देखील त्यांनी म्हटले. यंदा 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे देखील शरद पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर देखील त्यांनी यावेळी टीका केली. यावेळी ते म्हणाले कि, पक्ष सोडताना नेते सांगतात विकास करण्यासाठी भाजपमध्ये जात आहे. मग मी या लोकांना अनेक वर्ष मंत्रीपदे दिली त्यांनी काही विकास केला नाही का ? असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला.

त्याचबरोबर त्यांनी बेरोजगारीवर देखील भाष्य केले. तरुणांच्या बेरोजगारीवर बोलताना ते म्हणाले कि, नोकरी नसल्याने तरुण लग्न देखील करत नाहीत. त्याचबरोबर या सरकारने किती कारखाने सुरु केले यापॆक्षा किती कारखाने बंद पडले याची आकडेवारी द्यावी, असे आव्हान देखील त्यांनी सरकारला दिले.
दरम्यान, शरद पवार यांनी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर आता उरलेल्या उमेदवारांची घोषणा कधी करतात याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

Visit – policenama.com