शरद पवारांची प्रकृती ठणठणीत, ब्रिच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   पित्ताशयावरील शस्त्रक्रियेनंतर ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रवके व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. शरद पवार यांची प्रकृती उत्तम असल्याचंही मलिक यांनी सांगितले आहे.

शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना मागील महिन्यात ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर एन्डोस्कोपी करुन त्यांच्या पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला होता. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर 11 एप्रिल रोजी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 12 एप्रिल रोजी त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवस ते डॉक्टरांच्या निगराणी खाली होते. त्यांची प्रकृती ठीक असल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शरद पवार यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर देशातील अनेक नेत्यांनी त्यांची विचारपूस केली होती. तसेच काही राजकीय नेत्यांनी रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आता शरद पवार यांची तब्येत बरी आहे. देशभरातील जनतेने, चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या शिवाय दिलेल्या पाठिंब्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.