नाईक कुटुंब मला भेटल्याचे फोटो 5 वर्षापूर्वीचे, शरद पवारांनी दिले स्षष्टीकरण

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ( Anvay Naik Suicide Case ) रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी ( arnab-goswami) यांच्या अटकेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीतील नेते व विरोधी पक्षातील नेते यांच्यातही आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. असे असतानाच सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP chief Sharad Pawar) यांच्यासोबत अन्वय नाईक यांच्या पत्नी व मुलीचा फोटो (viral-photo-of-naik-family ) व्हायरल होत आहे. यावरून राष्ट्रवादी टीकेचा धनी ठरत असतानाच शरद पवार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. नाईक कुटुंब मला भेटल्याचे जे फोटो व्हायरल होत आहेत ते पाच वर्षांपूर्वीचे असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. अर्णब यांच्या अटकेनंतर अन्वय यांच्या पत्नी अक्षता नाईक व मुलगी आज्ञा नाईक यांनी महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले होते. तसेच राज्यातील जनतेलाही पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध असल्याच्या चर्चा होत होत्या. या सगळ्या प्रकरणावर शरद पवार यांनी आज पहिल्यांदा भाष्य केले आहे. नाईक कुटुंब मला भेटल्याचे जे फोटो व्हायरल होत आहेत ते पाच वर्षांपूर्वीचे आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, राज्यपालांनी (Governor Bhagat Singh Koshyari ) गृहमंत्र्यांना केलेल्या फोनसंदर्भातही त्यांनी भाष्य केले आबे, राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली हे चांगले आहे. पण मला वाटतं की, ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगले वाटलं असते, असा टोला त्यांनी लगावला आहे.