पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही : शरद पवार

तुळजापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटून शक्य तितके जास्त कर्ज घ्यावे, अशी विनंती करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. ते दोन दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. तुळजापूर दौऱ्यानंतर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याच्या विषयावर बोलताना, संपूर्ण कर्जाचं ओझं राज्य सरकारला एकट्याला झेपेल का ? असा मुद्दाही उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आधी कधीही आलं नाही, इतकं मोठं संकट राज्यावर आलं आहे. गावपातळीवर रस्ते खराब झाले आहेत. यामध्ये मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. महाराष्ट्रावर ऐतिहासिक आर्थिक संकट असल्याचे पवारांनी म्हटले आहे. अतिवृष्टीचा ऊसाला मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठी वापरता येणार नाही. सोयाबीनचही मोठं नुकसान झाल्याचे पवारांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागाचं प्रचंड नुकसान झालं आहे. सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी सोयाबीनचं पिक घेतलं व ते गोळा केलं. परंतु ते सगळं वाहून गेलं. अतिवृष्टीमुळे जमिनीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. नुकसान भरुन काढण्यासाठी कर्ज घेण्याला पर्याय नाही. पिक विम्यासंदर्भात शिथिलता आणण्यासाठी केंद्राकडे मागणी करणार आहे. हा प्रश्न खूप मोठा आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करायला हवी. केंद्र व राज्य सरकार दोघांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.