‘तेव्हा मी ८ वर्षाचा होतो, मग त्याचा दोष माझ्यावर कसा टाकतात ?’ : शरद पवार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशात 2 पंतप्रधान हे काँग्रेसचे धोरण तुम्हाला मान्य आहे का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्धा, औसा आणि अहमदनगर येथील जाहिर सभेत शरद पवारांना केला होता. याबाबत शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले, ‘घटनेत नसताना हे दुसरे पंतप्रधान पद आले कुठून ? काश्मीर भारतात विलीन होताना सन 1948 ला काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही अधिकार त्या राज्याला दिले आहेत. तेव्हा मी 8 वर्षाचा होता. मग त्याचा दोष मोदी माझ्यावर कसा टाकतात ?’ सध्या राज्यात आघाडीची हवा असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चार-चार वेळा दौर्‍यावर यावे लागते असेही पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपाने गतवेळची निवडणुक विकासाच्या मुद्यावर लढविली, त्यांना लोकांनी संधी दिली. मात्र, त्यांना 5 वर्षात सोने करता आले नाही. त्यामुळे सध्या जनता देशात आणि महाराष्ट्रातही सत्‍ता बदल करण्याच्या मानसिकतेत आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर शरद पवार हे 2 दिवसाच्या कोल्हापूर दौर्‍यावर आहेत. पत्रकार परिषदे दरम्यान पवारांनी पंतप्रधान मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.

भाजपाने दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत, कामे देखील केली नाहीत म्हणुनच आता भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी काहीपण टीका करून संभ्रमावस्था निर्माण करीत आहेत. यापुर्वी मोदींनी माझ्यावर व्यक्‍तिगत टीका केली. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी वेगळच काहीतरी बोलुन संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींनी माझ्यावर काश्मीरच्या भुमिकेबाबत आरोप केले. प्रत्यक्षात काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती किंवा त्यांच्या पक्षाशी आमचा काही एक संबंध नाही. भाजपाच त्यांच्यासोबत सत्‍तेत सहभागी होता. त्यामुळे काश्मीरबद्दल माझ्याकडे उत्‍तरे मागण्या ऐवजी मोदींनीच ती उत्‍तरे द्यावीत असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

गेल्या चार वर्षामध्ये मोदींनी एकही मुद्याची अमंलबजावणी काश्मीरमध्ये केली नसल्याने तेथील तरूण पिढी संतप्‍त झाली आहे. तेथील जनतेचा विश्‍वास संपादन करण्यात अयशस्वी ठरलेली मोदी हे आता इतरांवर ढकलत आहेत. ज्यावेळी काश्मीरला काही अधिकार देण्यात आले त्यावेळी आपण 8 वर्षाचे होतो. मग त्याचा दोष मोदी माझ्यावर कसा टाकतात ? असा सवाल देखील शरद पवारांनी केला आहे.