सर्वपक्षीय बैठकीत शरद पवारांचा PM मोदींना सल्ला, केल्या ‘या’ 10 मोठ्या मागण्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाबाधित रुग्णांची देशातील वाढती संख्या लक्षात घेत या संकटातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनापासून अर्थव्यवस्थेपर्यंत अशा काही मुद्यांवर पंतप्रधान मोदी यांना सल्ला दिला आहे. या चर्चे बाबत शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून पंतप्रधान मोदी यांच्यासोबत नेमक्या कोणकोणत्या गोष्टीवर चर्चा झाली आणि त्यावेळी काय मागण्या करण्यात आल्या, याबद्दल सांगितले.

शरद पवारांच्या 10 मागण्या
1. कोरोना ही जागतिक महामारी दीर्घकालीन लढायची आहे. याचे परिणाम जागतिक आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊन शकतात. त्यादृष्टीने उचित पावले उचलण्याची आवश्यकता आहे. एकंदरीत आर्थिक व्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आत्तापासूनच विचार सुरु करावा.
2. कोरोनामुळे शेती, उद्योग, व्यावसाय क्षेत्र अडचणीत आलेले आहेत. शेतांमध्ये रब्बीचे पीक तयार आहे. परंतु फळ, फुलं, भाजीपाला यांची साठवणूक – विक्री याबाबत प्रत्येक बाबतीत अडचणी निर्माण झाल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी वर्ग व शेतीवर अवलंबून असणाऱ्या घटकांना तातडीने दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्राने पावले उचलावीत.
3. केंद्र सरकारने राज्य सरकारचे उत्पन्न कसे वाढेल याकडे देखील लक्ष पुरवावे. जीएसटी करता राज्यांचा वाटा अद्याप राज्याला मिळालेला नाही. अशा राज्यांकडे तो तातडीने वर्ग करावा.
4.करोना महामारीनंतर आर्थिक संकटे ओढवल्यानंतर काही कडक उपाययोजना कराव्या लागतील. त्यादृष्टीने नॉन प्लॅन एक्सपेंडिचर म्हणजे नियोजनबह्य खर्चावर कात्री लावावी लागेल. केंद्र शासनाचा विचार नवीन संसद भवन बांधण्याचा आहे. त्याची आवश्यकता तपासून प्रसंगी ते लांबवणीवर टाकता येईल का, याचाही विचार करावा.
5. राज्यपातळीवर काही राज्यांमध्ये असे ऐकायला मिळते की माननीय राज्यपालांकडून देखील थेट कार्यकारी वर्गाला सूचना निर्गमित होतात. राज्यपाल महोदयांना राज्याच्या बाबतीत सल्लामसलत करण्याचे अधिकार आहेत. ते त्यांनी जरूर वापरावेत. मात्र, मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत तसे झाल्यास राज्यात दोन सत्ताकेंद्रे होणार नाही. समन्वयामध्ये चूक होणार नाही असे मला वाटते.
6.स्थलांतरितांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार बंद असल्यामुळे बरेचसे लोक जागोजागी अडकून पडले आहेत. अशा लोकांसाठी स्वयंसेवी संस्था आणि सरकार अन्नपाणी, तात्पुरता निवारा याबाबतीत लक्ष पुरवत आहे. परंतु सरकारने अशा स्वयंसेवी संस्थांना देखील हातभार लावावा.
7. ज्याच्याकडे आधार कार्ड अथवा रेशन कार्ढ नसेल अशा व्यक्तींपर्यंत सुद्धा अन्न पोहोचले पाहिजे.
8. देशात संपूर्ण लॉक डाऊन असल्यामुळे बऱ्याच समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. परंतु महामारीचा सामना करणे अपरिहार्य असल्याने त्याबाबतीत राज्यनिहाय विचार करावा. आरोग्याशी तडजोड न करता लोकांच्या जीविताशी तडजोड न करात काही भागात लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत विचार करता येईल का हेही पहावे.
9. कोरोनाचे गांभीर्य पाहता लोकांनी सहकार्य केलेले आहे. मागे दिल्लीतील निजामुद्दीन येथील गर्दीमुळे रोगाच्या प्रसाराबाबत चिंता निर्माण झाली. पण आता जे झाले ते मागे ठेवून रोग प्रसार कसा रोखता येईल यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. कोणत्याही समाजाला दोष देणे किंवा प्रसाराचा ठपका ठेवणे बरोबर नाही.
10. समाजातील काही घटक, मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये जातीयतेचा रंग देणे, दोन समाजांमध्ये भेदभाव व द्वेषाची भावना पसरवणे हा प्रकार होत असेल तर अशा शक्तींचा वेळीच बंदोबस्त करावा. मीडियाला देखील विनंती आहे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा दाखवून समाजामध्ये क्लेश निर्माण होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like