धनंजय मुंडे प्रकरणी SP दर्जाच्या महिला अधिकार्‍यानं चौकशी करावी : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे.

“राष्ट्रवादी नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, हे आरोप करणाऱ्या व्यक्तीविषयी इतर काही गोष्टी पुढे आल्या आहेत. आता हे प्रकरण पोलिसांत गेलं आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं पक्षाच्या बैठकीत ठरलं आहे,” अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. तसेच एसपी दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने या प्रकरणाचा चौकशी करावी. या संपूर्ण प्रकरणाची सत्यता जाणून घेतली पाहिजे, असंही शरद पवार पुढे बोलताना म्हणाले.

बलात्काराचा आरोप आणि विवाहबाह्य संबंधाची स्वतःच दिलेली कबुली, यामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. विरोधी पक्षांकडून वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून तातडीने निर्णय घेऊ, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी काल बोलताना केलं होतं. परंतु, काल या प्रकरणाला वेगळं वळण मिळाल्याचं पाहायला मिळालं. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केलेल्या महिलेबाबत भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यानंतर या महिलेने ब्लॅकमेल केल्याचा दावा आणखी दोघांनी केला आहे. त्यानंतर मात्र धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला असून संपूर्ण पोलीस चौकशी झाल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं पक्षाच्या बैठकीत ठरलं असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

धनंजय मुंडे, भाजप, मनसे नेत्यासह एका व्यक्तिचे ‘त्या’ महिलेवर गंभीर आरोप
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेबाबत भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यानंतर या महिलेने ब्लॅकमेल केल्याचा दावा आणखी दोघांनी केला आहे. भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सदर महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. मनसे नेते मनीष धुरी आणि जेट एअरवेज कंपनीतील रिझवान कुरेशी या अधिकाऱ्यानं देखील रेणू शर्मावर असाच आरोप केला आहे.