शिवसेना अद्यापही ‘वेटिंग’वर ! काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा ‘तुर्तास’ निर्णय नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात 3 मोठे पक्ष सत्तास्थापन करू शकले नाहीत म्हणून सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यानंतर सत्तापेच सोडविण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे शरद पवारांना भेटण्यासाठी मुंबईत दाखल झाले. शरद पवार आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यामध्ये सखोल चर्चा झाली. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात आणखी चर्चा करणार आहेत. अद्यापही काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेला वेटिंगवर ठेवलं आहे. तुर्तास आघाडीनं शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. शिवसेनेनं पहिल्यांदाच दि. 11 नोव्हेंबर रोजी अधिकृतरित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संपर्क केला होता. त्यामुळे सर्व विषयांवर चर्चा करणं गरजेचं होती. ती आज (दि.12) झाली. आणखी देखील चर्चा होणार आहे. दरम्यान, राज्यपालांनी आम्हाला चर्चा करण्यासाठी भरपुर वेळ दिला आहे, आम्हाला गडबड नाही असं मिश्किलपणे शरद पवार म्हणाले.

पत्रकार परिषदेत अहमद पटेल म्हणाले, मी राष्ट्रपती राजवट लागू केल्याची निंदा करतो. सध्याच्या केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात मनमानी केली आहे. सध्या सरकारनं लोकशाहीची थटा केली आहे. राज्यपालांनी काँग्रेसला निमंत्रण दिलं नाही हे चुकीचं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या मुंबई झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, केसी वेणुगोपाल यांच्या राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक तसेच काँग्रेसचे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते.

दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांची भेट घेवुन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उध्दव ठाकरे हे आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अरविंद सावंत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि इतर महत्वाच्या सेनेच्या नेत्यांसह हॉटेल द रिट्रीट पोहचले. त्यांची बैठक झाली आहे. हॉटेलमध्ये पोहचल्यानंतरच उध्दव ठाकरे यांनी सर्वांना हॉलमध्ये बसण्यास सांगुन 2-3 फोन कॉल येणार असल्याचं सांगत थोडे बाजूला गेले होते. त्यामुळे त्यांचं आणि आघाडींच्या नेत्यांचं बोलण झालं का याबाबत देखील उत्सुकता आहे. राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्याच्या निर्णयाला शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर उद्या (बुधवारी) सुनावणी होणार आहे. दरम्यान, उध्दव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांना धीर दिला आहे.

Visit : Policenama.com