डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा ‘निधी’ वाडियाला देण्यात यावा ; प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर शरद पवार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या प्रस्तावित जागेची आणि आराखड्याची पाहणी केली. दादर येथील इंदू मिलमध्ये हे स्मारक उभारण्याचं काम सध्या चालू आहे. स्मारकाच्या जागेची पाहणी झाल्यानंतर शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की मनात आणलं तर पुढील २ वर्षात स्मारकाचं काम पूर्ण होऊ शकतं परंतु त्यासाठी हे काम आव्हान म्हणून स्वीकारायला हवं.

दरम्यान याबाबतीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मागणी केली होती की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यापेक्षा तो निधी मुंबईतल्या वाडिया रुग्णालयाला द्यावा. याबाबतीत शरद पवारांना विचारणा केल्यास ते म्हणाले, वाडियाला त्यांचा निधी मिळेल, परंतु स्मारक देखील झालेच पाहिजेत. प्रकाश आंबेडकर यांनी स्मारकाला विरोध दर्शवला असून पवारांनी कोणाचेही नाव न घेता भाष्य केलं. ते म्हणाले सर्वांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. आपण सगळ्यांचं ऐकून घ्यायचं आणि त्यातून योग्य ते घेऊन आणि बाकी सोडून घ्यायचं, असं शरद पवार म्हटले.

बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम शापूरजी पालोनजी ही कंपनी करत आहे आणि कंपनीनं ठरवलं तर स्मारकाचं काम दोन वर्षांत पूर्ण होऊ शकेल. त्यासाठी कंपनीनं हे काम आव्हान म्हणून स्वीकारायला हवं असं पवार म्हणाले. हे स्मारक भविष्यात देशातीलच नव्हे तर परदेशातील नागरिकांसाठीदेखील आकर्षण ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाप्रमाणेच शिवस्मारकाची देखील पाहणी करणार का, या प्रश्नावर मात्र पवारांनी भाष्य करणं टाळलं.

फेसबुक पेज लाईक करा –