मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फोन कॉलवर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांच्या भेटीनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (ncp-chief-sharad-pawar) यांच्याशी फोनवर चर्चा केली. शरद पवार यांनीही राज यांच्याशी फोनवर चर्चा केली असून भेटीबद्दल मात्र काहीही ठरले नसल्याचे, स्पष्ट केले आहे.

राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात वाद पेटलेला आहे. याच दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. परंतु, ही भेट वाढीव वीज बिल आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी राज्यपालांनी राज ठाकरेंना शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला. राज ठाकरे यांनीही राज्यपालांच्या शब्दाला मान देत शरद पवारांशी फोनवर चर्चा केली. राज यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर शरद पवारांनी खुलासा केला आहे. राज यांचा मला फोन आला होता. आमच्यात भेटण्याबद्दल काही ठरले नाही. मी बाहेरगावी चाललो आहे. त्यामुळे भेटीच असे काही नियोजन ठरले नाही. मला फक्त राज ठाकरे यांनी सांगितलं की, मला राज्यपालांनी तुमच्याशी बोलण्याचा सल्ला दिला असल्याचे पवारांनी सांगितले.

राज्यपालांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि वीज बिलाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी शरद पवारांच्या कोर्टात चेंडू टोलावला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या त्या पत्रामुळे नाराज असल्याचे राज्यपालांनी एकाप्रकारे सांगून टाकले आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील संघर्ष कायम राहणार याचे चिन्ह कायम आहे.

काय आहेत राज यांच्या मागण्या ?

‘लॉकडाउनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल आकारण्यात आले आहे. याबद्दल आम्ही राज्य सरकारशी बोललो. आमच्या नेत्यांनी ऊर्जा मंत्र्यांची भेट सुद्धा घेतली. पण, त्यावर अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारने वीज ग्राहकांना गेल्या महिन्यांच्या वीजबिलातील वाढीव रक्कम परत करायला हवी, अशी पहिली मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

तसेच ‘दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावरही राज ठाकरेंनी लक्ष्य वेधले आहे. आज दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था एका लिटरमागे शेतकऱ्याला 17 ते 18 रुपये देतात आणि त्यावर भरघोस नफा कमावतात. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. वाढत्या महागाईमुळे गुरांची देखभाल करणे महाग झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका लिटरमागे 27 ते 28 रुपये मिळावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.

You might also like