नगरच्या जागेबाबत आज अंतिम निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या जागेबाबत आज अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दिल्लीत जागावाटपाबाबत अंतिम बैठक होणार आहे. या बैठकीवरच विखे यांचा पक्षप्रवेश अवलंबून आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ जागा आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे इच्छुक डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीकडे जागा सोडण्याची मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती. मात्र राष्ट्रवादी जागा सोडायला तयार नसल्याने डॉ. सुजय विखे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याबाबत राजकीय हालचाली सुरू केल्या होत्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली होती. मात्र भाजपात प्रवेश करीत असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी अधिकृत प्रवेश करत असल्याचे जाहीर केलेले नाही. आज दिल्लीत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत नगर व औरंगाबाद जागा आदला-बदल करण्याबाबत निर्णय घेऊ शकतो. तसे झाल्यास विखे हे काँग्रेसमध्येच राहणे पसंत करतील.

दरम्यान, विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यास आपला पत्ता कट होऊ शकतो, या भीतीने अस्वस्थ झालेल्या खासदार दिलीप गांधी यांनी दिल्ली गाठली आहे. त्यांच्याकडून पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा सुरू आहे. तसेच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांची भेट घेऊन विखे यांचा भाजप प्रवेश रोखवा, असे साकडे घातले आहे. आजचा दिल्लीतील बैठकीत सर्व राजकीय घडामोडी अवलंबून आहे.