वैद्यनाथ साखर कारखान्यातील चोरी प्रकरणात चक्क मंत्र्याच्या कार्यकर्त्याचा हात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – परळी तालुक्यातील कौठाळी शिवारातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या (Vaidyanath Co-Operative Sugar Factory, Parli) स्टोअर व वर्कशॉप गोदामातून 37 लाख 84 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी (Robbery) झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या (NCP) नगरसेविकेच्या पतीचा हात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

अजीज इस्माईल उर्फ मंगलदादा शेख असं या आरोपीचं नाव असून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगलदाद शेख सध्या फरार असून त्याचा ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु आहे. मंगलदादा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे समजतय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) या कारखान्याच्या चेअरमन आहेत.

परळी तालुक्यातील पांगरी येथील वैजनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोअर गोडाऊन व वर्कशॉप गोडाऊन आहे. कोरोना संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे कारखाना बंद होता. याच कालावधीत ही घटना घडली आहे. ही घटना 13 ते 17 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घडली आहे. या संदर्भातील माहिती स्टोअर किपर जी.टी. मुंडे यांनी कारखान्याच्या लिपिक व लीगल इंचार्ज खदिर शेख यांना सांगितले.

स्टोअर गोदाम वर्कशॉप मधून संगणक, मॉनिटर, 200 किलो कॉपर मटेरियल, 400 किलो मिलबोरिंग, ब्रास इंपेरियर, बुश राउंड बार असे एकूण 37 लाख 84 हजार 914 रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. लिपिक खदिर शेख यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.