‘तो छोडता नही’ ! राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची सेनेच्या महिला नगराध्यक्षांना ‘धमकी’

दापोली : पोलीसनामा ऑनलाइन – तेरेको भेजा है क्या ! तेरे जगह कोई पुरुष होता तो उसको नही छोडता, लेकिन तुझे भी देख लुंगा, अशी धमकी चक्क सभागृहातच शिवसेनेच्या नगराध्यक्ष परवीन शेख यांना दिल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने हे कृत्य केल्यामुळे शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतला आहे.

दापोली शहरातील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई केल्यानंतर दापोली नगरपंचायतीने विशेष सभा बोलावली होती. या सभेत दापोली शहरातील अनधिकृत टपऱ्यांच्या मालकांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यावर चर्चा झाली. मात्र, शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही सत्ताधारी पक्षांकडे स्पष्ट बहुमत असल्याने, आम्ही पर्यायी जागेचा विषय निकाली काढू असे सत्ताधारी नगरसेवकांनी सांगितले.

त्यानंतर तुम्हाला जर विषय निकाली काढायचा होता तर आम्हाला कशासाठी बोलावलं, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी नगरसेवक खालिद रखंगे यांनी विचारला. तसेच सत्ताधारी पक्ष आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आणि मनमानी कारभार करीत असल्याचा आरोपही खालीद रखंगे यांनी केला. दरम्यान, रखंगे यांनी महिला नगराध्यक्षांबद्दल अर्वाच्य भाषा वापरत तेरेको भेजा है क्या, तेरे जगह पुरुष होता तो उसको नही छोडता, लेकिन तुझे भी देख लुंगा, अशी धमकी दिली.

रखंगे यांच्या या विधानामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधक यांच्या जोरदार खडाजंगी झाली. शिवसेनेचे सर्व नगरसेवकही नगराध्यक्षांच्या मदतीसाठी सरसावले. सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधक नगरसेवक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकारानंतर हे प्रकरण पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडे घेऊन जाणार असल्याचे शिवसेनेचे गट नेते प्रकाश साळवी यांनी सांगितले. दापोली नगराध्यक्षांना भर सभागृहात धमकी प्रकरण विरोधी नगरसेवक खालिद यांना चांगलेच भोवणार असल्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/