भगवान बाबांच्या पुण्यतिथीला गोपीनाथ मुंडेंनी ‘रक्ताचं’ नातं ‘तोडलं’, धनंजय मुंडेंचे ‘भावनिक’ विधान

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे नवनिर्वाचित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे आपल्या मंत्रीपदाच्या प्रवासाबद्दल बोलताना भावूक झाल्याचे आज पहायला मिळाले. मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच परळीत जात आहे. त्यापूर्वी त्यांनी भगवान गडावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते भावूक झाले. ते म्हणाले, 2012 मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर सात वर्षांनी मंत्री झालो आहे. जानेवारी महिन्यात भगवान बाबांची पुण्यतिथी होती. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपल्या मोठ्या भावाशी रक्ताचं नातं तोडण्याची भाषा केली होती. पक्षात काहीच स्थान राहिलं नसल्याने तो निर्णय घ्यावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मला अनेक प्रश्न विचारण्यात आले. बेईमान, गद्दार, खलनायक म्हणून पाच वर्षे बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात मी वावरलो. त्यानंतर आता ही जबाबदारी मिळाली असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. उशिरा का होईना सत्याचा विजय झाला. सत्याच्या मागे नियती उभी राहिली याचा आनंद आहे. हा इमानदारीचा चमत्कार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, परळीकरांना, बीडकरांना निवडणुकीत जो शब्द दिला, तो पूर्ण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच परळी आणि बीडच्या जनतेचं उत्पन्न दुप्पट करणं हे आपले ध्येय असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. काही वर्षापूर्वी भगवानगडावर येण्यापासून अडवणूक करत दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला होता, यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणले, गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते म्हणून पहिल्यांदा भगवान गडावर गेले त्यावेळी त्यांनाही विरोध करण्यात आला होता. त्यांच्याही ताफ्यावर दगडफेक झाली होती. परंतु नंतर भगवान गडावर अभूतपूर्व स्वागत झाले. माझ्या बाबतीत देखील तसेच घडलं. पूर्वी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होतो. आता जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक राहणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/