‘कोरोना’ची लक्षण जाणवत असल्याचा एकनाथ खडसेंचा दावा, ED समोर हजर होणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांना ED ने नोटीस बजावली आहे. पुण्यातील भोसरीतील भूखंड खरेदी प्रकरणी बुधवारी (दि. 30) मुंबईत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे खडसे मुंबईत दाखल झालेही आहेत. मात्र, ते उद्या ED कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहाणार नसल्याची माहिती समजते. याबाबत खडसे यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र देखील सादर केले आहे.

एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षण जाणवत आल्याची माहिती त्यांनी वकिलामार्फत कोर्टात दिली. त्यामुळे ते ED च्या चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही, असे सांगण्यात आले आहे. एकनाथ खडसे सध्या मुंबईत आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर देखील आहेत. दरम्यान, एक महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. आता पुन्हा एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणं जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे.

म्हणून चौकशीचा लागला ससेमिरा
भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यामागे ED च्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ED च्या नोटिशीनंतर एकनाथ खडसेंची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. खडसे भाजपमध्ये नाराज होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आपली ED कडून चौकशी केली जाऊ शकते, असा अंदाज खडसेंनी याआधी व्यक्त केला होता. त्यांनी ईडीची चौकशी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी भाजपला उद्देशून दिला होता. त्यामुळे आता खरच एकनाथ खडसे सीडी लावतात का? आणि या सीडीतून कोणाचा भांडाफोड करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.