‘राष्ट्रवादी’ला अजून वाटते ईव्हीएममध्ये ‘छेडछाड’ होण्याची शंका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीतील मतदानानंतर शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित केली होती. त्याचवेळी अजित पवार यांनी ईव्हीएम वरील आक्षेप फेटाळून लावले होते. त्यामुळे ईव्हीएम मशीन बाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गोंधळ असल्याचे समोर आले होते.

विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला अजूनही असे वाटते की ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते. या कारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रविवारी निवडणुक आयोगाला याबाबत एक पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील सर्व मतदान केंद्र आणि स्ट्रॉन्ग रुमच्या ३ किलोमीटर परिसरातील इंटरनेट बंद ठेवावेत, अशी मागणी केली आहे. स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम मशीन जमा होण्याबरोबरच या परिसरातील ३ किलोमीटरपर्यंत इंटरनेट २४ ऑक्टोबरला मतमोजणी पूर्ण होईपर्यंत बंद ठेवावे अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या सहीने हे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आजही राज्यातील अनेक नागरिकांना ईव्हीएम आणि व्ही व्ही पॅट हे हॅक होऊ शकतात अशी शंका आहे. आपण दिलेले मत त्या उमेदवाराला न जाता दुसऱ्या उमेदवाराला जाते अशी त्यांना भिती वाटते. मोबाईल इंटरनेटच्या सहाय्याने व्यावसायिक हॅकर्सकडून हे गुन्हेगारी कृत्य केले जाऊ शकते. त्यामुळे स्ट्राँग रुम परिसरातील इंटरनेट २४ तारखेपर्यंत बंद ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे.

visit : Policenama.com